Tuesday, 10 February 2009

महागडी आणि घातक लाइफ स्टाइल

पश्चिम कडील महागडी आणि घातक लाइफ स्टाइल
काल सकाळी सकाळी चहा पिण्याची इच्छा झाली ।पाणी चहा आणि साखर यांचं मिश्रण शेगडी वर ठेवलं आणि दूध घेण्यासाठी फ्रीज मधून कॅन बाहेर काढला आणि अचानक भारतातल्या दूध distibution system ची आठवण झाली. आपल्याकडे दूधा साठीचे तीनच पर्याय असतात. "भैया" चं दूध , प्लास्टिक च्या पिशवित मिळणारं चितळे किंवा शासकीय दूध अथवा क्वचित वापरलं जाणारं बाटलीतलं दूध. इकडे मात्र प्लास्टिक चे कॅन सोडून कोणताही पर्याय उपलब्ध नाही.


कचरा पेटी मधे पडलेल्या कॅन्स चा खच पाहून विचार आला की या देशात असे किती कॅन्स दररोज कचरापेटीत येत असतील? या canned milk system चे दोन दुष्परिणाम मला दिसतात।एक तर कॅन मुळे असणारी जास्त किंमत आणि त्याच्या वापरा नंतर होणारं प्रदूषण.आता तुम्ही विचाराल की प्लास्टिक च्या पिशव्यांमुळे प्रदूषण होत नाही का? नक्कीच होतं पण यातल्या खूपश्या पिशव्या recycle होतात. आता जर हे कॅन परत परत धुवून वापरत असतील तर मात्रमी वरचे विधान परत घेतो. :)


पण प्रश्न फक्त कॅन्स चा नाहीये, इकडच्या छोट्या छोट्या गोष्टीत ही महागडी आणि घातक चैन दिसून येते।घरातल्या प्रत्येक व्यक्तीची असणारी वेगळी कार असो , किचन मधील (किचन मधेच का, सर्वच ठिकाणी )भरमसाठ वापरला जाणारा टिशु पेपर असो , बाथरूम मधे असणारा आंघोळीचा एकमेव पर्याय ,टब असो किंवा छोट्या अंतरासाठी कार वापरण्याची सवय असो, सर्वच ठिकाणी प्राकृतिक साधनांचा दुरुपयोग आढळतो. tesco सारख्या मोठ्या मॉल मधे आणि कचरापेटी साठी करोडो प्लास्टिक पिशव्या दररोज वापरल्या जातात. यातल्या कितपत पिशव्या recycle होतात ,देव जाणे !


फारच टीका झाली ना यांच्यावर! तश्या काही चांगल्या सवयी पण आहेत यांच्या पण त्याबद्दल नंतर कधीतरी "आठवून आठवून " लिहीन :)

Monday, 9 February 2009

लिटिल चॅम्प्स

लिटिल चॅम्प्स
रविवार ,सुट्टीचा दिवस.काहीही कारण नसताना लवकर जाग आली. खिडकी मधून बाहेर बघतो तर नेहमी सारखे खराब वातावरण.गेला आठवडा भर हिम वृष्टी झाली होती. ढगाळ हवामान ,कडाक्याची थंडी आणि बर्फा मुळे झालेले घसरडे रस्तेही बाहेरची परिस्थिती. आजचा दिवस पण या बंदिस्त रूम मधे काढायचा आहे हे कळून चुकलं. आमचं घर हे 'बंदिस्त 'खोल्यांचं आहे .प्रत्येक जण स्वत: च्या रूम मधे दार बंद करून बसतो.अशा वेळेस करमणुकीचं एकच साधन ,२४ तास चालू असणारं broad band internet.
अशी उदास मनस्थिति असताना एकदम आठवलं ,आज तर सारेगमप लिटिल चॅम्प्स ची फाइनल आहे . रविवार च्या सुट्टीचा आणि ब्रॉड बॅंड internet चा पुरेपूर वापर करायचा ठरवलं. स्थानिक वेळेनुसार २ ला सुरू होणार होती फाइनल. चोरून झी मराठी चे फीड दाखवणार्या ३,४ साइट्स शोधून ठेवल्या .जेवण आटपून (तयार करून + जेवून ) १:३० ला तयार झालो. 'पूर्वरंगाचा ' कार्यक्रम चालू होता. चोरलेले प्रक्षेपण अत्यंत नीट व वीना अडथळ्याचे दिसत होते.
जशी जशी मूळ कार्यक्रमाची वेळ जवळ यायला लागली , तसा तसा मला या प्रक्षेपणात बदल जाणवू लागला.१० मिनिटा पुर्वी अत्यंत चांगले असणारे प्रक्षेपण बिघडू लागले. कधी कधी नुसता आवाज,कधी स्थिर चित्र ,तर कधी काहीच नाही अशी स्थिती झाली त्या सगळ्या साइट्स वर! माझ्या उत्साहा वर पाणी फिरवलं गेलं.शेवटी काय ,तर कार्यक्रम एन्जॉय करत दुपार घालवण्याचं माझं स्वप्न भंगलं.
नंतर विचार करत असताना जाणवलं की प्रक्षेपण बिघडणं साहजिकच होतं. मोजक्या ३,४ साइट्स वर अचानक एवढे लोड आल्यामुळे हे होणारच होते. या कार्यक्रमाच्या जागतिक लोकप्रियतेचा अंदाज आला.आणि का असु नये लोकप्रियता ?सर्वच लहान मुले ही एक चमत्कार होती ,आहेत. प्रथमेश ,आर्या ,मुग्धा ,कार्तिकी ,रोहित .....स्वर्ग लॉकीचे गंधर्वच जणू. एवढ्या लहान वयात असलेली संगीताची प्रगल्भता अचंभित करणारी होती.एवढ्या लोकप्रियतेनि सुद्धा त्यांची निरागसता हरवली नव्हती. आणि प्रत्येकाच्या गाण्याचं वेगळं वैशिष्ठ !आर्याच्या गाण्यातला गोडवा ,प्रथमेश च्या गाण्यातला शास्त्रीय आभ्यास,मुग्धा च्या गाण्यातली निरागसता, कार्तिकी चा गवरान ठसका,आणि रोहित चा रॉकिंग पर्फॉर्मेन्स मन प्रफुल्लित करून जातो.कार्यक्रमाच्या निकाला बद्दल काही खास उत्कंठा नव्हती .कारण सगळ्यांनी अवघ्या मराठी संगीत जगताला कधीच जिंकलं होतं.
शेवटी या सुरेल आठवणी स्मरत निवांत पणे ताणून दिली ! आता वाट बघायची , कोण सगळ्यात आधी अपलॉड करतो हा कार्यक्रम त्याची!(अरे रे ,झी मराठी , internet वरच्या साइट्स आणि अपलॉड वीरांना धन्यवाद द्यायचं विसरलोच होतो !धन्यवाद रे सगळ्यांना .)

इथून आले आहेत पाहुणे