"कार"सेवक.......
हा लेख सत्यघटनेवर आधारीत आहे.........लेखातील पात्र आणि घटना काल्पनिक नसून वास्तवतेशी त्यांचा फार जवळचा साध्यर्म्य आहे।
अरेरे फारच सिरीयस झालात तुम्ही वाचून ... विसरून जा पहिली दोन वाक्यं! उगाच टाकली आहेत। :-)
तर हा लेख आयोध्या आणि राममंदिराशी निगडीत नाही हे तुमच्या सारख्या चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेल। हा लेख आहे एका खऱ्या खुऱ्या कार सेवकावर. हा सेवक म्हणजे माझा इग्लंडमधील रूममेट. अत्यंत भक्तीभावाने याची सेवा चालू आहे. कंगाल झालो तरी बेहत्तर पण कार आराधना सोडणार नाही असा त्याचा पण.
वरील विधानांचा संदर्भ जाणण्यासाठी आपल्याला चार आठवडे काळाच्या मागे जावे लागेल.
शनिवारची सकाळ होती। सुट्टीचा दिवस असल्याने उगाच लोळत पडलो होतो. अचानक हा मित्र (याला आपण राहूल म्हणूया ) माझ्या रूम मधे आला आणि म्हणाला "आज मी कार विकत घेणार" आधी मला वाटलं राहूल झोपेत बडबडत आहे. पण नाही, तो पूर्णपणे शुद्धीत होता. अरे कार म्हणजे काही भाजीपाला आहे की घेतली पिशवी आणि निघालो मंडईत॥ सेकंड हॅंड असली तरी काय झालं ... पण राहूलला कारप्रेमाने झपाटलं होतं. काहीही करून आज त्याला कार आणायची होती.
मग आमच्या सर्वांचं नेटवर कार संशोधन सुरू केलं। दोन तासांनी वोल्कस वॅगन कंपनीची पसात नावाची गाडी राहूलला पसंत पडली। फोटोमधे नवी कोरी वाटत होती. त्या मानाने किंमत सुद्धा कमी होती (राहूल साठी बरं का! गेले दिड वर्ष ओनसाईट आहे तो. ). फक्त ७५० पाऊंड. लगेचच मालकिण बाईंना फोन केला. सॉरी बाई नाही ,तरूणी. फोनवर ७०० मधे सौदा पक्का झाला. तिला चेक चालणार नव्हता. ए टी एम चं ३०० पाऊंड चं लिमीट होतं आणि शनीवार असल्याने बॅंकांचा हाफ डे त्यामुळे त्या सुद्धा बंद. शेवटी आमच्या दोघांच्या(मी आणि आमचा तिसरा रूममेट) अकाऊंट मधून उधारी घेण्याचं ठरलं. ’ती’ वेगळ्या गावात रहात असल्यामुळे एक तिसरी जागा ठरवली जिथे आम्ही भेटणार होतो. आधी तिचा विश्वासच बसत नव्हता कि ठरलेल्या ठिकाणी आम्ही येऊ! तीन चार वेळा फोन करून तिने खात्री करून घेतली. राहूल ला जरा टेन्शन आलं होतं. यु के लायसन असलेल्या आमच्याच कंपनीतल्या एकाला घेऊन आम्ही निघालो(याला सुद्धा महत्प्रयत्नानंतर युकेचं लायसन मिळालं होतं, हा तर राहूलच्या वरचढ होतो. ३ वर्षापूर्वी ३००० ची स्पोर्ट्स कार याने घेतली होती यानं! पण कार ची खूप माहिती होती त्याला).
मालकीण बाई जरा उशीराच आल्या। आपल्या ३ सखींबरोबर. नुकत्याच झोपेतून उठून (बहुतेक त्याच तोकड्या कपड्यात) चौघी आल्या होत्या. गाडीचे चहूबाजूंनी निरीक्षण करण्यात आले. आर्ध्या तासांची टेस्ट ड्राईव्ह झाली. गाडी तशी दहा बारा वर्ष जूनी असूनही सातव्या मालकाकडे येईपर्यंत धडधाकट होती. उगाच काहीतरी कारण काढत ६०० ची ऑफर केली. जास्त घासाघीस न करता ६५० हि किंमत पक्की झाली. लगेचच पैसे काढून तिला देण्यात आले. आता प्रश्न होता लीगल प्रोसिजरचा. पण ती तर फारच सोप्पी निघाली. एका कागदावर "हि गाडी अमूक अमूक कडून अमूक अमूकला विकण्यात येत आहे" असं लिहिण्यात आलं. खाली दोन अमूकांची सही. त्याची एक कॉपी इकडच्या वाहतूक विभागाला गाडीच्या काही कागदपत्रासोबत पाठवण्यात आली. बास....झालं.......
राहूल आता या विदेशा मधे कार चा मालक झाला होता। पण या काररूपी पांढऱ्या हत्तीला पाऊंड रूपी उस चारून तिची सेवा करावी लागेल याची कल्पना नव्हती त्याला.
पहीला उस, इन्शुरन्स। कार चालवणाऱ्याचा आणि कारचा दोघांचा इन्शुरन्स आवश्यक असतो इथे. मुख्य रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या असतात. त्यांच्याकडे सगळ्या कार चा अप टू डेट डेटाबेस असतो. एखादी अन इन्शुअर्ड कार दिसली कि दिसली, तिचा पाठलाग होतो. आणि त्या कारला (मालकाला जेल)
"युके लायसन" हा या हत्तीचा आवडता उस! प्रोव्हिजनल (लर्निंग) लायसन साठी ६० पाऊंड खर्च होता। तसं हे लायसन दोन दिवसातच आलं पण अट अशी होती कि या लायसनवर गाडी चालवताना शेजारी ३ वर्ष युके लायसन वाला पाहीजे होता. फक्त फायदा असा की या लायसन वर इन्शुरन्स मिळू शकत होता. "फक्त" १३०० पाऊंडामधे वर्षभराचा इन्शुरन्स मिळाला. हि रक्कम गाडीच्या किंमतीपेक्षा दुप्पट होती! पहिला धक्का!
धक्यांची श्रुंखला चालू राहीली जेव्हा युकेचं पर्मनंट लायसन च्या खर्चाचा अंदाज आला। गाडी शिकण्याचे धडे ( ज्या शिवाय लायसन मिळणं अशक्य होतं), लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षाची फी एकूण ८०० च्या घरात जात होती. हे म्हणजे कोंबडी आणि मसाल्यासारखं झालं.
बिच्चारा राहूल. सध्या लपवून छपवून गाडी चालवतोय. ही कारसेवा फारच महाग पडत आहे. पण त्याने ध्यास सोडलेला नाही आणि त्याला जास्त दुःख पण होत नाहीये. असते काही जणांना क्रेझ! लेखी परीक्षेचा जोरदार अभ्यास चालू आहे त्याचा. आपण सर्व मिळून त्याला शुभेच्छा देऊया!

