Saturday, 4 July 2009

मिनी युरोप टूर

मिनी युरोप टूर

२० जुलैला शॅन्गेन वीसा एक्स्पायर होणार होता. वीसा साठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी निदान दोनदा तरी युरोप मधे जाणं आवश्यक होतं. पहिली ट्रिप पॅरीस-फ्रांस ची झाली होती. दुसऱ्या ट्रिप साठी बेल्जियम, नेदरलॅंड, जर्मनीची निवड केली. कारणं तशी अनेक होती.. एक तर तीन नवीन देश बघायला मिळणार होते, टूर बऱ्यापैकी स्वस्त होती, स्टार टूर च्या सहली मधे काही सिटस रिकाम्या होत्याशिवाय टूर फक्त चार दिवसाची होती(सुट्‍टीचा जास्तप्रोब्लेम नाही आणि कंटाळा येण्याच्या आत घरी परतणार होतो.)

सहलीचं बुकिंग ऑनलाईन केलं. मागच्या वेळेप्रमाणे सहल वेंब्ली पासून निघणार होती. सकाळी ५:३० पर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं होतं. या वेळी माझ्या राहुल(अधिक माहिती साठी मागचे काही ब्लोग वाचा :)) नामक मित्राने त्याच्या स्वतःच्या गाडीतून मला आणि माझ्या तिघा मित्रांना वेंब्ली पर्यंत सुखरूप पोहोचवलं. कपडे आणि काही दैनंदिन वापरातल्या गोष्टी सोडून जास्त सामान बरोबर नव्हतं. सर्वात महत्वाची म्हणजे खाण्याचा एकही पदार्थ बरोबर घेतला नव्हता कारण तिन्ही वेळेचं खाणं स्टार टूर वाले देणार होते. आणि हे भारतीय खाणं आमच्या सारख्या बॅचलर लोकांसाठी मेजवानी होती. मागच्या सहलीतल्या रूचकर पदार्थांची चव अजूनही जीभेवर रेंगाळत होती.

सगळे प्रवासी भारतीय असूनही आमच्या कोच ने भारतीय प्रमाण वेळ(कमीत कमी १ तास उशीरा) पाळली नाही. गाडी अगदी वेळेत निघाली डोव्हर च्या दिशेने. मागच्या वेळेपेक्षा जहाज प्रवासाची exitement या वेळेस जरा कमीच होती, कारण त्याच बोटीने त्याच बंदरापासून त्याच बंदरा(कॅले)पर्यंत जाणार होतो. या वेळी मात्र प्रवासाच्या दिड तासापैकी १ तास सी गल पक्ष्यांनी आमचं मनोरंजन केलं. अगदी हातावर बसून बिस्कीट खाण्यापर्यंत ते
माणसाळले होते.

कॅले ला पोहोचल्यावर आमच्या कोचने ब्रसेल्स कडे प्रयाण सुरू केले. फ्रांस सोडून बेल्जियम मधे प्रवेश केल्यावर
एका चॉकलेट फॅक्ट्री पाशी आमचा कोच थांबला. नानाविध चॉकलेटस पाहून आणि चाखून(चवीसाठी) झाल्यावर फॅक्ट्रीच्या मागच्या रिकाम्या जागेत बुफे डिनर झाला. आमच्या बससोबत संपूर्ण प्रवासभर, स्वयंपाक करण्यासाठीचा कॅरेव्हन होता. आमच्या विश्रांतीच्या ठिकाणी आमच्या आधी पोहोचून जेवण तयार ठेवत होते.आचारी गुजराथी असल्याने सहजीकच अत्यंत चविष्ट आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती. अगदी ढोकळ्या पासून साजूक तुपातील शिऱ्या पर्यंत चे सर्व पदार्थ जेवायला घालून सगळ्यांचं मन जिंकलं होतं त्यानी. जेवणानंतर मसाला चहा पिण्याची सवय सुद्धा त्यानेच लावली. मनसोक्त जेवण झाल्यावर ब्रसेल्स कडे निघालो. आमचा टूर मॅनेजर तर गप्पा मारण्यात आणि किस्से माहिती सांगण्यात expert होता. गाडीतील प्रत्येकाला समोर बोलवून हातात माईक देऊन बोलतं केलं त्यानी. सहाजिकच सगळ्यांची ओळख वाढली. आमच्या गाडीत तब्बल १० डॉक्टर आणि ३ लंडन मेट्रो चे रिटायर्ड ड्रायवर निघाले. जवळ जवळ ७०% पब्लिक गुजराथी होतं(अमेरीकेवरून आलेलं)
.

ब्रसेल्सला पोहोचेपर्यंत तीन वाजले होते. हे शहर म्हणजे बेल्जियम आणि युरोपियन युनियन ची राजधानी. युरोप मधल्या सर्वच शहरांसारखे अत्यंत स्वच्छ आणि टापटीप शहर. काचेच्या ऊंच इमारती असलेच्या आधुनिक भागातून आमची गाडी मुख्य आकर्षण असणाऱ्या ग्रंड प्लेस (grandplace)
पाशी आली. पार्किंग पासून हा शहराचा मुख्य आणि अत्यंत सुंदर चौक जरा दूर होता. चालत चालत चौकाकडे निघालो. हा चौक अत्यंत विशाल होता. चारही बाजूंनी मेडिव्हियल, कोरीव इमारतींनी वेढलेला. ऊंच आणि कोरीव चर्च सर्वात लक्षवेधी होतं. आजूबाजूच्या सर्व इमारती या ठिकाणच्या व्यापारी संघटनांची हेड क्वार्टर होती अशी
माहिती आम्हाला देण्यात आली.याच चौकात बेल्जियम मधील सुप्रसिद्ध गोदीवा चॉकलेट चं मुख्य दुकान आहे. दर दोन वर्षांनी, एका आठवड्यासाठी या चौकात ट्युलिप फ़ुलांचा गालिचा घातला जातो. चौकाच्या एका अरूंद गल्लीतून प्रसिद्ध अश्या मेनेकेन पिस स्टॅचू (manneken pis statue)पाशी पोहोचलो. सर्वप्रथम हि मुर्ती कुठे दिसेनाच
! नंतर निरखून बघितल्यावर चौकाच्या कोपऱ्यार एक छोटी मूर्ती दिसली. अवघी २ ते अडीच फूट उंचीची "शू" करणाऱ्या मुलाची मुर्ती होती ती. या उघड्या पोराला म्हणे देशोदेशीच्या राजा राण्यांनी कपडे भेट केले होते. आम्ही गेलो तेव्हा याने नाविकाचे कपडे घातले होते. फोटो काढून झाल्यावर त्या परिसरात जरा हिंडलो. अनेक म्हातारे कपल्स रस्त्यावरील रेस्टोरंट च्या बाहेर बसून व्हिस्की/दारू (त्यांचं पाणी) पित बसले होते. हवा सुद्धा तशी खूप
गरम होती. काही वेळातच त्या चौकात डॉग शो सुरु झाला. १० मिनिटाचा शो संपल्यावर हिंडत हिंडत बसपर्यंत पोहोचलो. वाईट गोष्ट म्हणजे याच
वेळी माझ्या मित्राचं पाकिट एका अल्जेरियन(त्याने सांगितल्याप्रमाणे) माणसाने मारलं. बॉलिवूड बद्दल गप्पा मारत हा माणूस त्याच्या जवळ आला होता. हे काम त्याने
इतक्या सफाईपणे केले होते कि त्या दिवशी रात्री हॉटेल वर पोहोचेपर्यंत आम्हाला या गोष्टीची कल्पना सुद्धा आली नाही. जेव्हा हि गोष्ट लक्षात आली त्यावेळी आम्ही दुसऱ्या देशात होतो
(नेदरलँड) :( ....

आमच्या गाडीच्या जवळच पुण्याच्या केसरी टूर्स ची गाडी उभी होती. अनेक दिवसांने एवढे मराठी बोलणारे लोक भेटल्याने जरा खूश झालो मी. या गाडीतले बरेचसे लोकं रिटायर्ड आजी आजोबा होते. आमच्या आणि केसरी टूर चे मॅनेजर सुद्धा एकमेकांना चांगलेच ओळखत होते.

पुढचं ठिकाण होतं ऍटोमियम. या ठिकाणी लोखंडचा(fe) एक मोलिक्यूल एक करोड पटींनी मोठा करून त्याची एक भव्य प्रतिकृती बनवली होती. अत्यंत भव्य अश्या प्रतिकृती सोबत फोटो कढून झाल्यावर हॉटेल
च्या वाटेने निघालो. नेदरलॅंड मधील झोतेरमियर नावाच्या ठिकाणचं गोल्डन ट्युलिप नावाच्या हॉटेल मधे पुढील २ दिवस आमचा मुक्काम होता. ऍमस्टरडॅम पासून जवळ जवळ १ तास दूर हे हॉटेल होतं.

नेहमी प्रमाणे रुचकर असे जेवण झाल्यावर शतपावली साठी जवळच्या रेल्वे स्टेशन वर जाऊन आलो. रात्री रूम
वर परत येऊन झोपेपर्यंत १२ वाजले होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल तर्फे देण्यात येणारा कॉन्टीनेन्टल नाश्ता उरकून मदुरोदॅम या ठिकाणी मिनी हॉलंड बघायला निघालो. हॉलंडमधील प्रमुख वास्तू छोट्या स्केल मधे या ठिकाणी तयार केल्या होत्या. छोट्या रेल्वे, बस, विमाने, रोप वे बघून दिवाळीतल्या किल्याची आठवण झाली. मुख्य म्हणजे सर्व प्रतिकृती ंमधे यांत्रिक हालचाली होत्या. हे प्रदर्शन बघताना हरवून गेलेलं मन भानावर आलं ते सुरु झालेल्या पावसाने.....

गाडीत परत आल्यावर पावसाने सुद्धा विश्रांती घेतली. काही वेळातच चीज आणि क्लॉग फॅक्टरी या पुढच्या ठिकाणी पोहोचलो. चीज तयार करण्याची पद्धत ९० वर्षाच्या तरूणीने (तिच्या चेहेऱ्यावर एक सुद्धा सुरकुती नव्हती) अत्यंत मनोरंजकपणे समजावून सांगितली. हॉलंडच्या गाई म्हणे दिवसाला ३० लिटर दूध देतात...... चीज चे
वेगवेगळे प्रकार बघून झाल्यावर क्लॉग(लाकडी बूट) तयार करण्याचं प्रात्यक्षिक बघितलं. या ठिकाणी आमरस पूरीचं जेवळ उरकून हॉलंड ची खासियत असलेल्या एका पुरातन पवनचक्की पाशी गेलो. पूर्वी या पवनचक्यांचा उपयोग पाणी उपसण्या साठी किंवा गिरणी म्हणून होत असे. सध्या बंद पडलेल्या या पवनचक्या हॉलंडचा ऐतिहासिक वारसा म्हणून उभ्या होत्या. या ठिकाणी फोटो काढून झाल्यावर प्रवासातल्या सर्वात सुंदर अश्या वोलेंदाम फिशिंग व्हिलेज मधे पोहोचलो.
या ठिकाणी प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे समुद्र आणि जमिनीची पातळी. समुद्राची पातळी जमिनीच्या चक्क १,२ फूट वर होती! एक धरणवजा भिंत समुद्र आणि जमिनीला विभागत होती. हॉलंड ची बरीचशी जमिन हि समुद्रातून खेचून काढलेली आहे याचा प्रत्यय या ठिकाणी आला. गाव खरचं खूप सुंदर होतं. पुरातन काळापासून आधुनिक काळा पर्यंतच्या सर्व प्रकारच्या होड्या या ठिकाणी बघायलामिळाल्या. समुद्र किनारी आणि किनाऱ्यावरच्या मार्केट मधे फिरण्यात वेळ कसा गेला हे कळलचं नाही.

या ठिकाणाहून निघून आम्ही ऍमस्टरडॅम शहरात प्रवेश केला. सर्व प्रथम डायमंड कटींग फॅक्टरी ला भेट दिली. डायमंड कटिंग मधील बारकावे आणि हिऱ्याची किंमत ठरवणारे चार c(carat, color, cut, clarity) या ठिकाणी समजावून घेतले. यानंतर पाळी होती ऍमस्टरडॅम क्रूज ची. ऍमस्टरडॅम शहर कालव्यांचं शहर आहे. याच कारणाने ऍमस्टरडॅम शहराला वेनीस ऑफ द इस्ट सुद्धा म्हणतात. दिड तसाच्या होडी प्रवासात संपूर्ण शहराचं दर्शन घडलं. तसं फारसं सुंदर किंवा स्वच्छ शहर नव्हतं हे.. अरूंद घरं हे या ठिकाणचं वैशिष्ठ... सर्वात अरूंद घर तर ५२ सेंटीमीटर रूंद आणि ३ मजले उंच होतं. अरूंद घरांचं कारण सुद्धा तसच होतं, पूर्वी म्हणे घराच्या दर्शनी भागावर टॅक्स ठरवला जायचा. या मुळे सगळीच घरं अरूंद होती. प्रत्येक घराच्या वरच्या मजल्यावर फर्निचर खिडकीतून आत घेण्यासाठी हूक होता. काही ठिकाणी तर कालव्यांमधे होडीवजा , अधिकृत घरं होती. टूर गाईड ने दिलेल्या माहिती नुसार दर आठवड्याला जवळ जवळ ३ गाड्या या कालव्यांमधे पडतात. :)

होडीतून बाहेर पडून ऍमस्टरडॅमच्या मुख्य रस्त्यावर आणि मुख्य चौकापाशी तास भर हिंडलो आणि हॉटेल वर परतलो.

तिसऱ्या दिवशी नाश्ता उरकून हॉटेलचा निरोप घेतला आणि जर्मनी च्या दिशेने निघालो. जोरदार पावसाने आमचं जर्मनी मधे स्वागत केलं. काही वेळातच कलोन या शहरातील डोम कॅथेड्रल पाशी पोहोचलो.
ख्रिश्चन लोकांची हि पवित्र वास्तू दोन विश्व युद्धाचा सामना करून तशी च्या तशी शाबूत होती. अत्यंत भव्य आणि कोरीव चर्च बघून पुढचा प्रवास सुरू केला.

वाटेत एका पार्किंगच्या ठिकाणी भर पावसात बुफे जेवण जेवलो. :) अतिशय सुंदर अश्या रस्त्यावरून जर्मनी आणि विश्वयुद्धाचा इतिहास ऐकत बोप्पार्ड या ऱ्हाईन नदी वरच्या छोट्या गावात पोहोचलो. रम्य आणि शांत गावाचा फेरफटका मारून दिड तासाच्या अत्यंत मनोहारी अश्या ऱ्हाईन क्रूज साठी होडी मधे शिरलो.

पावसाळी वातावरण,नदीच्या किनाऱ्यावरील गावं ,डोंगर , किल्ले बघताना मन प्रसन्न झालं. दिड तासच्या सुंदर प्रवासानंतर आम्ही एका वेगळ्याच गावात पोहोचलो
जिथे बस आमची वाट बघत उभी होती.
बस मधे बसल्या वर फ्रॅंन्कफर्ट या तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. संध्याकाळचे जेवण उरकून आमच्या बरोबर असणाऱ्या, १४ दिवसांच्या युरोप सहलीच्या प्रवाश्यांचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लंडन च्या दिशेने निघणार होतो आणि हे सर्व जण स्वित्झर्लंड मधे शिरणार होते. रात्री शहरात चक्कर मारण्यासाठी निघालो, पण निम्या वाटेतूनच परत आलो. कारण उशिर झाल्यास हॉटेल मधे परत येण्याचं काही साधन उपलब्ध नव्हतं.

सहलीचा चौथा दिवस तसा बोअरच होता. ७ तासाचा कॅले पर्यंतचा प्रवास. वाटेत ब्रसेल्स शहरात मदुरोदॅम सारखेच मिनी युरोप हे प्रदर्शन पाहिले. तेवढेच सुंदर होते हे प्रदर्शन..... या ठिकाणी पॅक्ड लंच खाऊन ४ पर्यंत कॅले मधे पोहोचलो. या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांकडून आमचं चेकिंग झालं. तिथून समुद्रमार्गे डोव्हर आणि पुढे लंडन ला पोहोचे पर्यंत रात्रीचे १० वाजले होते.

सर्व सहप्रवाश्याना निरोप देवून रेल्वे पकडून रॉयस्टन मधे परत आलो. गेल्या सात महिन्यात ६ देशांमधे जाऊन आलो होतो मी!







Saturday, 27 June 2009

NRI च्या दृष्टीकोनातून..............

NRI च्या दृष्टीकोनातून..............


प्रवास केल्याने ज्ञानात भर पडते, हे काही खोटं नाही. नवे देश, नवी संस्कृती, नवीन लोकं सर्वच गोष्टी ज्ञानात भर घालतात. युरोप च्या टूर मधे बहूतेक सहप्रवासी NRI होते. बरचसे NRI हे अमेरीकन असतात हे वेगळं सांगायची गरज नाही. :) त्यांचे अनुभव , सल्ले ऎकण्याची संधी या सहलीत मिळाली.

पहील्याच दिवशी गाडीत सगळ्यांनी आप आपली ओळख करून दिली होती. ६०% प्रवासी हे रिटायर्ड पेन्शनर होते. प्रत्येकाची मुलं ही डॉक्टर किंवा इंजीनियर.......प्रथीतयश कंपन्यांमधे काम करणारी. ३० % लोकं ही ब्रिटन मधली डॉक्टर कपल्स होती. इग्लंड मधे एवढे भारतीय डॉक्टर आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती. आमचा टूर ओपरेटर तर सांगत होता की पूर्वी जवळ जवळ ९०% प्रवासी हे डॉक्टर असायचे. आणि त्यांना वाटायचं कि कोणत्यातरी मेडीकल कॉन्फरन्स साठी सगळ्यांना घेऊन निघाले आहेत कि काय......... बाकीचे १० टक्के आमच्यासारखे software engineer. डेप्यूटेशन वर आलेले. एकटे, नाही तर बायको बरोबर.

टूर बरोबर ४ दिवसात तीन देश फिरणं म्हणजे खरं तर एक marathon चं होती. तरीही प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जरा निवांत वेळ मिळाला आणि गप्पा सुरु झाल्या. आमच्या बरोबर दोन गुज्जु फॅमिली होत्या. या लोकांशी बरीच ओळख झाली होती. त्यातलाच एक पक्का गुज्जु businessman ओबामाला शिव्या घालत होता. तो पर्यंत मी सुद्धा ओबामाची एकच बाजू ऎकली किंवा वाचली होती ज्यात ओबामाची स्तुती आणि बुशला शिव्या घातल्या गेल्या होत्या. तर या गुज्जुच्या मते तो आणि त्याचा मित्र हे अमेरिकेच्या २% सर्वात श्रीमंत लोकांमधले होते. अमेरीकेत यांची हॉटेल्सची चेन होती.ओबामा बद्दल चे त्याचे विचार ऎकण्या सारखे आहेत । त्याच्या मते त्याच्या सारखी २% श्रीमंत लोकं संपूर्ण अमेरीकेच्या इन्कम टॅक्स मधली ७० % रक्कम भरतात आणि तो स्वतःच्या कष्टाच्या कमाईतली ५०% रक्कम सरकारला देत आहे. श्रीमंतांना लुटून काम न करण्याऱ्या, बसून खाणाऱ्या गरीबांमधे पैसे लुटण्याची ओबामाची पॉलिसी आहे आणि याच कारणामुळे तो जास्त लोकप्रिय आहे. त्याच्या मते अमेरीकेतील श्रीमंत लोकांवर ओबामाने अत्याचार सुरू केलाय. याच्या पेक्षा बुश हजार पटींनी चांगला होता. हा ओबामा काही वर्षात अमेरीकेची नक्कीच वाट लावणार असं ठाम पणे सांगत होता तो .

ते काहीही असू दे , अमेरीकेचा त्याला जाज्वल्य अभिमान होता.
या अभिमानाच्या (आणि पित असलेल्या विस्कीच्या) भरात भारत काय इग्लंडला पण नावं ठेवून झाली. त्याच्या "गाव"ची लोकं कशी चांगली आहेत, वर्ण,वंशद्वेष अजिबात नाही हे फार कौतूकाने सांगत होता. आम्हाला तर स्वतःचं कार्ड देवून आग्रहाचं निमंत्रण केलं. शिवाय आम्हा बॅचलरांना "फुकट"चा सल्ला सुद्धा दिला कि लंगड्या, लुळ्या, आंधळ्या कशाही असू दे; एका अमेरीकन पोरीशी लग्न करा आणि तिकडे या... घटस्फोट तो मिळवून देईल आणि आमची आख्खी लाईफ बनवेल! :) काही गुजराथी मुली सजेस्ट करेपर्यंत त्याची मजल गेली...... :) त्याची ही इंग्रजी तली बडबड ऎकण्यात खूप मजा आली आणि किवही आली त्याच्या विचारसरणीची......

इथून आले आहेत पाहुणे