एप्रिल महिना जसा जवळ येत होता तशी डोक्यात विचारांची चक्रं फिरु लागली होती. कारण एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यात सलग ४ दिवस सुट्टी होती इस्टर ची. आधी विचार होता भारतात जाण्याचा, पण ४ दिवस म्हणजे फारच धावती भेट झाली असती आणि कंपनी सुट्टी द्यायला तयार नव्हती. मग विचार केला, चला अजून एखादा नवीन देश बघून
घ्यावा. आधी प्लॅन होता ऍमस्टरडॅम, जर्मनी वगैरे बघायचा.
पण जो पर्यंत विचार पक्का झाला तो पर्यंत सगळ्या टूर्स चं बुकिंग फुल झालं होतं. आता स्कॉटलंडला पर्याय नव्हता.
स्कॉटलंडला जाण्यासाठी कार चं बुकिंग ऑनलाईन केलं. त्यानंतर प्रवासात सर्वात उपयोगी पडलेल्या सॅटेलाइट नॅव्हिगेटर (टॉम टॉम/ वाटाड्या) चं बुकिंग केलं. या उपकरणा बद्दल विस्तृत विवेचन करणं आवश्यक आहे. खरं सांगायचं तर य टॉम टॉम शिवाय आमची सहल होऊच शकली नसती. इच्छित स्थळा पर्यंत मार्ग दाखविणे हे याचे सगळ्यात बेसिक काम, पण या खेरीज अनेक गोष्टिंसाठी उपयोगी पडले हे उपकरण. उदाहरणार्थ, वेगाची मर्यादा न पाळल्यास ऐकू येणारा बीप, इच्छित स्थळा पर्यंतचं अंतर, लागणारा वेळ, सर्वात सोइस्कर रस्ता, पर्यायी रस्ता, जवळची प्रेक्षणीय ठिकाणे, पेट्रोल पंप, होटेल, स्पीड कॅमेऱ्याची ठिकाणं, शहराचा नकाशा, राउंड अबाउट मधील नेमकं एक्झीट या सर्व गोष्टी आमच्या सारख्या नवख्या चाल
कांसाठी आणि प्रवाश्यांसाठी फार आवश्यक होत्या. आमच्या ड्रायवरांनी(माझे कंपनीतले मित्रच) आत्तापर्यंत एकदाही इकडच्या रस्त्यावर गाडी चालवली नव्हती. दोघांनीही भारतात खूप चालवली होती गाडी पण इकडचे रस्ते आणि वाहतुकीच्या नियमां बद्दल दोघेही निरक्षर होते. त्यामुळे आमच्या पेक्षा आमचे सिनीयरच जास्त चिंतीत होते."सुखरूप परत येणार का नाही" आणि आले नाही तर "कामाचं काय होणार" हि शंका सगळ्यांच्या डोक्यात होती. त्यामुळे गाडी आणल्यावर एका अनुभवी ड्रायवर (माझा रूममेट) बरोबर आमच्या दोन मित्रांना २ तास प्रशिक्षण देण्यात आलं. (खरचं आवश्यक होतं हे प्रशिक्षण !)
या नंतर कुठे कुठे जायचं आणि कुठे रहायचं हा मोठा यक्षप्रश्न होता. तसा चौघांनाही देश नवीन होता, आणि पाहण्याची खूप ठिकाणं आहेत असं ऐकून होतो. शेवटी अनेक दिवसांच्या चर्चा चर्वणा नंतर रहायची आणि पहायची ठिकाणं ठरली. सर्वात स्वस्त अश्या यूथ होस्टेल मधे तीन दिवसांचं बुकिंग केलं. या होस्टेल बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. प्रत्यक्षात राहण्याचा अनुभव विलक्षण होता. ते नंतर सविस्तर सांगीनच!
निघायच्या आदल्या दिवशी फोर्ड फोकस ही गाडी घेऊन जोरदार खरेदी केली खाण्यापिण्याची. गाडीचं एक्स्टा लार्ज बूट(डिकी) पुर्ण भरून गेलं होतं या सामानानी. हेच सामान आम्हाला ३ दिवसांपर्यंत पुरून उरलं ! गाडी बरोबर एक्स्टा प्रोटेक्शन सुद्धा विकत घेतलं होतं, जेणेकरून गाडी सह आम्हाला काही झालं तर नंतर भुर्दंड नको. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० ला निघायचं ठरलं कारण आमचा पहिल्या दिवशीचा मुक्काम जवळ जवळ ५५० मैल दूर होता आणि खूप हेक्टीक ड्राइव होतं . शिवाय १
२ नंतर रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होण्याचे चान्सेस होते. खाण्याचे पदार्थ करता करता आणि बॅग भरता भरता १२ कधी वाजले कळलच नाही.
दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे "साडे आठ"ला निघालो. तशी या गोष्टीची कल्पना होती मला. माझ्या मित्रांना पुरता ओळखून होतो मी. त्या मुळे मी सुद्धा निवांत उठलो होतो. टॉम टॉम च्या सहाय्याने मार्गक्रमण चालु झालं. सकाळची वेळ असल्याने दोघेही मित्र(ड्रायवर) उत्साहात होते. आती उत्साहाच्या भरात गाडी कधी कधी १२० मैल/किमी म्हणजे जवळ जवळ १९० च्या स्पीड नी पळवत होते. रोडच होता तसा. या मुख्य रस्त्यांना इथे मोटर वे म्हणतात. रस्त्यावर काही ठराविक अंतरा नंतर इंधन, फूड स्टॉल, स्वच्छ्तागृह उपलब्ध करून देणं हा नियम आहे या रस्त्यांसाठी. भरभाव वेगानी केंब्रिज, बर्मिंगहॅम ,लिवरपूल, मॅनचेस्टर, प्रेस्टोन आदी शहरांना बाय बाय करत निघलो होतो. वाटेत एके ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर मात्र
आम्ही ट्रफिक जॅम मधे अडकलो. त्या नंतरच्या एक तासात आमची गाडी फक्त ५ ते १० मैल अंतर कापू शकली. यातून सुटका झाल्यावर मनोहारी अश्या लेक डिस्ट्रीक्ट मधे प्रवेश केला. चहूकडे दिसणारी हिरवळ आणि निवांत चरणाऱ्या मेंढ्या हेच दृश्य काही तास दिसत होतं.
संध्याकाळच्या सुमारास स्कॉटलंड मधे प्रवेश केला. बाहेरील निसर्ग सौंदऱ्यानी जणू काही जादूच केली आमच्यावर. गाडीचा वेग आपोआप मंदावला. सगळ्यांचे कॅमेरे बाहेर निघाले आणि बाहेरील निसर्ग टिपू लागले. वाटेत डिझेल साठी एका पंपा वर थांबलो. स्वतःच्या हातानी डिझेल भरलं, कार्डानी पेमेंट करून पुढे निघालो.एडिनबर्ग (स्कॉटलंड ची राजधानी) मधे पोहोचे पर्यंत साडे सहा वाजले होते. होस्टेल मधे पोहोचायच्या आधी एका सुंदर तळ्याजवळ गाडी थांबवली. खरंतर ते तळं नसून खाडी होती.
जवळच विमानतळ असल्यामुळे खूप कमी उंचीवरुन विमानं उडत होती. याच्या किनाऱ्यावरच तंबू ठोकून राहावं असं वाटण्यासारखा सुंदर होता सगळा परिसर. आणि घडलं सुद्धा तसंच. काहीच अंतरावर दिसणारी एक जुनी महाला सारखी दिसणारी वास्तू आमचं ग्लोबट्रेकर होस्टेल निघालं.
१०० एक लोकांची व्यवस्था होइल इतकं मोठं होतं ते होस्टेल. सगळ्यात वाखाणण्याजोगं होतं ते त्याचं व्यवस्थापन आणि सुविधा. तसं म्हणावं तर भारतीय धर्मशाळेच्या / डोर्मेट्री लेवल चं हे निवासस्थान. पण सर्व सुविधांनी युक्त. शेअर्ड किचन, मोठी लाउं
ज (सोफ़े असलेली रूम),टिव्ही रूम, नेट कॅफे पासून बार पर्यंतच्या सगळ्या सोई होत्या आत. हं ,राहण्याची जागा जरा गिचमीडीची होती एवढच. कारण बेड जे होते ते एकावर एक दोन. गेल्यागेल्याच आम्हाला प्रत्येकाला एक स्वाइप कार्ड आणि लॉकर ची चावी देण्यात आली. आमची रूम ६ जणांसाठीची आणि मिक्सड् (मुलं मुली एकत्र ) कॅटेगरीमधली होती. आणि आम्ही होतो ४ जणं. उरलेले दोन जणं किंवा जणी कोण असतील याचा विचार चालला होता. पण शेवट पर्यंत म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी निघे पर्यंत आम्हाला कळलं नाही कोण होते ते दोन जणं, पण कोणीतरी दुसरं होतं हे नक्की! (तसे पुरावे होते रूम मधे :)) काही वेळानी फ्रेश होऊन मुख्य शहर बघायला निघालो. साडेसात वाजले असूनही बाहेर लख्ख सूर्यप्रकाश होता.(हाच तर फायदा आहे "समर"(युद्ध नव्हे!) मधे सहल काढण्याचा)
शहराची वास्तूरच
ना पॅरीस च्या जवळ जाणारी होती. अगदी तेवढी सुंदर नसली तरी बऱ्यापैकी आकर्षक. जायचं होतं मुख्य चर्च आणि लायब्रेरी बघायला ,पण सगळ्यात मुख्य प्रश्न होता तो पार्किंग चा. एक तर मुख्य शहरात पर्किंगचे भरमसाठ दर (तासाला २ पाउंड), आणि अनेक ठिकाणी चालू असलेली रस्त्याची कामं या मुळे १५ मिनीटं त्याच भागात घिरट्या मारत होतो(थंक्स टू टॉम टॉम ,जो जास्त त्रास देत होता). शेवटी चर्च च्या जवळच फ्रि पार्किंग सापडलं. आणि चालत जाणे या उपायावर सगळ्यांचं एकमत झालं.
चर्च आणि त्याच्यासमोरचा पुतळा(काय माहीत कोणाचा ते) खूपच छान होता. जवळच स्कर्ट मधेले दोघं जणं बॅगपाईपर वाजवत होते. छान वाटत होता त्याचा आवाज. तसा आपल्या सनई जवळ जाणारा पण जास्त घुमणारा. त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर चालत निघालो. रस्त्यात एक विद्युत रोषणाई ने सजवलेला महाल दिसला. जवळ जाऊन बघतो तर ते रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड चं हेड ऑफिस निघालं. असच फिरता फिरता नॅशनल लायब्रेरी पर्यंत चालत गेलो. त्याच ठिकाणी एका पूलावरून एडिनबर्ग शहर आणि रेल्वे स्टेशनचं विहंगम दृश्य दिसले. संध्याकाळचा अंधार शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता. फोटो सेशन संपल्यावर परतीची वाट धरली, कारण जवळ जवळ दहा वाजत आले होते.
होस्टेलवर आल्यावर आमच्या परममित्रांनी(हेच आमचे ड्रायवर बरं का) बार चा रस्ता धरला. आम्ही आपले त्याला साथ म्हणून आत गप्पा मारत बसलो. दोघांचं मनसोक्त पिऊन झाल्यावर शेअर्ड किचन मधे जेवण केलं. करकरीत चादर, उशीचे कव्हर आणि डुवेट चे कव्हर घालून झोपेपर्यंत १२ वाजले होते.
सकाळी लवकरच उठलो, कारण बाथरूम आणि शॉवर सुद्धा शेअर्डच होते. साडेनऊच्या आत होस्टेल कडून कॉंप्लिमेंटरी नाश्ता होता. तोच नेहमीचा, कॉर्न फ्लेकस ब्रेड बटर ,जॅम ;ज्यूस चहा आणि कॉफी. आमचं बऱ्यापैकी लवकर आवरून झाल्याने मॉर्निंग वॉक साठी तळ्याकाठी गेलो, कोवळी ऊन्हं विस्तिर्ण पसरलेली हिरवळ, सी गल पक्षांचा आवाज याने दुप्पट उत्साह संचारला. नाश्ता करून होस्टेल ला बाय बाय केला आणि मुख्य कॅसल/किल्ला पहायला निघालो.
टॉम टॉम ने या वेळेस सुद्धा खूप भरकटवलं. ती त्याची चूक नव्हती, शहराच्या मुख्य रस्त्यावर ट्रॅम चं काम चालु होतं. त्यामुळे वाहतूकीमधे खूप बदल केला होता. आता ते त्याला कसं कळणार! तो आम्हाला घुमून फिरवून त्याच ठिकाणी आणत होता जिथे रस्ता बंद होता. काही वेळानी वैतागून एके ठिकाणी गाडी पार्क केली. एक तासाचं तिकिट काढून मुख्य रस्त्यावरून फिरत निघालो.
जवळच्या एका मेमोरिअल पार्क मधे गेलो. याच ठिकाणी त्या साधूचे दर्शन घडलं. (फोटो बघा :))
किल्याखालीच पार्किंग करून एका भव्य वळणावळणाच्या दगडी रस्त्याने किल्यापर्यंत पोहोचलो. तिथे जाऊन बघतो तर काय, मला तर भारतात पोहोचल्यासारखं वाटलं. किल्ला पहायला आलेल्या लोकांमधले एक चतुर्थांश लोकं भारतीय वाटत होते. या टूर मधे एक गोष्ट कळून चुकली, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, अशी कोणतीही जागा नाही जिथे भारतीय पोहोचला नाही. अगदी ग्लेन नेव्हीस(ज्या निर्मनुष्य ठिकाणी आमची गाडी पंक्चर झाली होती(दुसऱ्या दिवशी)अगदी तिथे सुद्धा एक साउथ इंडीयन कुटुंब भेटले होते )
किल्याच्या प्रवेशद्वारापाशीच भली मोठी रांग दिसली. रांगेची मला आधीपासूनच चीड आहे. इथे तर तिकिटासाठी तब्बल दीड तास तात्काळत उभं रहायला लागलं. तिकिटा बरोबर एक ऑडिओग्राफ सुद्धा भाड्यानी घेतला. मोबाईल सारखे हे यंत्र कानाला लावून किल्याचा इतिहास ऐकता येणार होता. किल्याची खूप चांगल्या प्रकारे देखभाल केली होती. आत एक खूप मोठं प्रदर्शन होतं ज्या मधे इंग्लंड आणि स्कॉटलंड मधील दीर्घकालीन लढाईचा संपूर्ण इतिहास आकर्षक रीत्या मांडला होता. वर्षानुवर्ष जतन केलेल्या ४ राजेशाही निशाण्या(सोन्याची तलवार, गुलाब, मुकूट, चौथी गोष्ट विसरलो! )तिथे बघायला मिळाल्या. अशी ३/४ प्रदर्शनं होती आत. काही वेळानी मात्र या गोष्टींचा कंटाळा आला. मग मात्र फोटो सेशन संपवून किल्याला राम राम ठोकला. गाडी कडे परत येताना वाटेत एके ठिकाणी स्कॉटीश वाईन चे प्रदर्शन पाहीले. आमच्या मित्रांनी महागड्या वाईन बरोबर स्वतःचे फोटो काढून घेतले. तो पर्यंत अडीच वाजले होते. आणि पोटात कावळ्यांनी कोलाहल माजवला होता. मग गाडीत बसूनच दुपारचं जेवण उरकलं आणि इनव्हरनेस चा रस्ता पकडला.
वाटेत फोर्थ नदी वरचा सुप्रसिद्ध! रेल्वे पूल बघितला. कलकत्याच्या हावडा पूला सारखाच होता तो, पण खूप लांब(४/५ किमी असेल). मग मात्र निसर्गाच्या कुशीतून आमचा प्रवास सुरु झाला. गर्द हिरवी सुरू ची झाडं, हिमाच्छादीत गिरीशिखरं, वळणावळणाचा रस्ता, छोटे झरे,धबधबे.......जणू काश्मिरच! वाटेत तीन ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबलो.
इनव्हरनेसला पोहोचेपर्यंत ७ वाजले होते. होटेल चा पत्ता दिल्यावर टॉम टॉम ने आम्हाला एका जीर्ण इमारती समोर आणून सोडलं होतं. त्या ठिकाणी बॅग पॅकर्स नावाचं होस्टेल होतं, पण आमचं बुकिंग मात्र इनव्हरनेस टूरीस्ट होस्टेल मधे होतं. जवळच एका पार्किंग वर गाडी उभी करून १५ ,२० मिनीटं इकडे तिकडे शोधत बसलो. शेवटी चौकशी अंती असं कळलं हि ज्या कळकट्ट होस्टेल समोर आमची गाडी थांबली होती तेच आमचं होस्टेल होतं. एकाच होस्टेल ची दोन नावं! शिवाय होस्टेल चं मुख्य दार सुद्धा लपवल्या सारखं कोपऱ्यात.दारापाशी जाऊन बघतो तर दार आतून लॉक होतं आणि दरवाजा उघडण्यासाठी एक कोड टाकायला लागणार होता. दारावर गिचमीडीत अक्षरात लिहीलं होतं "रिसेप्शन बंद आहे, आपले बुकिंग असल्यास खालील नंबर वर संपर्क साधा........" जरा वैतागलोच आम्ही. फोन केल्या वर एका माणसानी दरवाजा उघडण्याचा कोड दिला आणि शेवटी रिसेप्शन पाशी आम्ही पोहोचलो. बाहेरून जितकं खराब वाटत होतं तितकं काही खराब नव्हतं आतून. रिसेप्शन वर एक चित्रविचित्र कपडे घातलेला तरूण बसला होता. आम्ही बूक केलेली ४ जणांची रूम उपलब्ध नसल्याचा खुलासा त्याने अत्यंत गोड शब्दात केला. आणि आम्हाला इतर दोन रूम्स मधे राहावं लागेल असं सांगितलं. त्या रूम्स होत्या ४ आणि ८ लोकांसाठीच्या. नाईलाजास्तव तो पर्याय आम्ही स्विकारला. पण या गोष्टीची आम्हाला तीळमात्र कल्पना नव्हती की ,आमचे बाकीचे रूम पार्टनर मुली असतील म्हणून! एका खोलीत ६ दुसऱ्या खोलीत २...............
त्या रात्री सुद्धा आमच्या ड्रायवर मित्रांच्या "पेया"ची सोय म्हणून पब शोधत भटकलो. शनिवार ची रात्र असल्याने रस्त्यावर जिथे पाहावं तिथे दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या पोरी आणि पोरं दिसत होती आणि दिसत होते त्यांना आवरायला उभे असलेले पोलिस....... एका जुन्या दिसण्याऱ्या पब मधे मित्रांनी मनसोक्त पिऊन मनःशांती करून घेतली. त्याच ठिकाणी १५ मिनीटांच्या काळात दोन आजोबांशी(ते पण टुन होते :)) गट्टी जमली. ख्रिश्चन धर्मावर एक गंभीर चर्चा घडली . :)
तिथून परत रूम वर आलो. कॉमन रूम मधे जेवण उरकून झोपायला आप आपल्या खोलीत गेलो.रूम वरच्या मुलींशी बोलण्याचा जास्त योग आलाच नाही, कारण रात्री आम्ही उशीरा आलो होतो. आणि सकाळी त्यांची निघायची गडबड होती. सकाळच्या गप्पांमधे कळलं की त्या जर्मनी वरून फिरायला आल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची सकाळची फ्लाईट होती.
सकाळी उरकून नाश्ता करे पर्यंत साडे दहा वाजले होते. चेक आउट करावं म्हणून रिसेप्शन पाशी गेलो तर तिथे कुणीच नव्हतं आणि त्या खोलीचं दार सुद्धा बंद होतं. पुन्हा त्याच नंबर वर कॉल केला आणि त्याने खोलीची चावी रिसेप्शन च्या दाराखालच्या फटीतून आत सरकवण्यास सांगितले !
अश्या या दिव्य होस्टेल ला निरोप देऊन थोडा वेळ इनव्हरनेस शहर फिरलो आणि लॉकनेस चा रस्ता पकडला. लोक् म्हण्जे तळं. स्कॉटलंड च्या या डोंगराळी भागात खूप सुंदर तळी आहेत. या सर्वांची नावं लोक् ने सुरू होतात. या तळ्याच्या काठानी नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात आमची गाडी मार्गक्रमण करत होती. वाटेत दोन तीन ठिकाणी ब्रेक घेतला. त्यातला एक ब्रेक फारच लकी ठरला. कारण याच ठिकाणी एका आधुनिक कोळ्याशी आणि त्याच्या भयावह कुत्र्याशी आमची मैत्री झाली. तळातल्या माश्यांचे प्रकार , आधुनिक फिशींग रॉड, माश्यांचे बेट(गळाला लावण्यात येणारे किडे) अश्या अनेक गोष्टींची सविस्तर माहिती मिळाली.
पुढचं ठिकाण होतं, उर्कहार्ट कॅसल. हा किल्ला लोकनेस तळ्याच्याच काठी होता. अत्यंत दिखणा किल्ला! आत तसं काही जास्त पाहण्यासारखं नाही असं ऐकून होतो. त्या मुळे १२ पाऊंड चं तिकिट न काढण्याचं ठरवलं. बाहेरूनच अनेक फोटो काढले आणि बेन नेव्हीस कडे वाटचाल सुरू केली. वाटेत द्वितीय विश्वयुद्धात मरण पावलेल्या स्कॉटीश सैनीकांच्या स्मृतीत बांधलेले अत्यंत दिखणे असे मेमोरीयल लागले. जितक्या सुंदर मूर्ती तितकीच सुंदर नेव्हीस पर्वत रांग तिथे होती. या पर्वतश्रेणी मधील बर्फाची शाल पांघरलेली सर्वच शिखरं इथून नीट दिसत होती. आर्ध्यातासाचं फोटो सेशन संपवून बेन नेव्हीस रोप वे कडे निघालो.
या रोप वे चे दोन झोन होते. ए झोन हा निम्या वाटेपर्यंत नेऊन सोडत होता. बी झोन हा शिखरापर्यंत पोचण्यासाठी होता ज्या ठिकाणी स्किईंग ची सोय होती. आम्ही बी झोन चं तिकिट काढायला गेलो, पण आमची घोर निराशा झाली. उन्हाळा सुरू झाल्याने खूपसा बर्फ वितळला होता आणि स्किईंग खूप धोक्याचं झालं होतं. त्यामुळे बी झोन बंद करण्यात आल होता. दुसरा काही पर्याय नव्हता, पण ए झोन मधली रोप वे फेरी सुद्धा खूप छान होती. वरून दिसणारं दृश्य फारच मनोहारी होतं. आम्ही आपले हौस म्हणून या ठिकाणा पासुन काहीशे मीटर अंतरापासून सुरू होणाऱ्या बर्फाला शिवून परत आलो. या ठिकाणा पर्यंत पोहोचण्या साठी सायकलीचा एक खडतर मार्ग सुद्धा होता.
खाली उतरल्यावर जेवण उरकलं आणि टॉम टॉम च्या मदतीने फारश्या प्रसिद्ध नसलेल्या इन्वरलोकी या किल्या पाशी पोहोचलो. किल्ला तसा पडका पण खूप छान होता. या ठिकाणच्या नदीकाठी बराच वेळ निवांत बसलो. आणि ५ च्या सुमारास ग्लेन नेव्हीस कडे निघालो.
ग्लेन म्हणजे दरी आणि बेन म्हणजे शिखर असा लढवलेला तर्क बरोबर निघाला. वाटेतच एक कॅरवान कॅम्प लागला. आता ही काय नवीन भानगड? उन्हाळ्याच्या दिवसात इकडची बरीच लोकं आपलं चालतं फिरतं घर कार ला लटकवून या भागात येतात, त्यांच्या साठी खास सोई इथे असतात. या गाड्यांसाठी लाईट आणि पाण्याची व्यवस्था अशा दुर्गम आणि जंगली भागात कशी होते कुणास ठावूक. भाडं सुद्धा भरपूर घेत असतील. असो ! हौसेपाई ही लोकं पैशाचा जास्त विचार करत नाहीत.
याच रस्त्यावर अजून एक महत्वाची गोष्ट दिसली जी पाहील्याशिवाय स्कॉटलंड ची सहल अधूरी राहीली असती. ती म्हणजे जंगली गाय. खास आमच्यासाठी म्हणून ती अगदी रस्त्याच्या कडेला आली होती.
सहलीतली सर्वात जास्त मजा आली ती इथे. गाडी पार्क केल्यावर लगेचच आमच्यातल्या एकाला गाडीचे पंक्चर झालेले चाक दिसले.
हा तर अगदी निर्मनुश्य भाग होता. मग काय, गाडीचं मन्युअल आणि स्टेपनी ,स्पेअर टायर डिकी तून बाहेर काढलं आणि टायर बदलायला लागलो. सगळे स्क्रू काढून सुद्धा टायर काही निघत नव्हतं, १० मिनीटभर सगळ्यांचे शक्ती चे प्रयोग करून झाले. मदतीसाठी जवळपास कोणीच नव्हतं. शेवटी नाईलाजाने भाड्याने कार घेतलेल्या कंपनीला फोन लावला. त्यांनी मात्र बाकी काहिच चौकशी न करता आम्ही कुठे आहोत हे नीट समजावून घेतलं आणि तासाभरात रिकवरी व्हॅन येईल असं सांगितलं. आता आम्ही कोड्यात पडलो, गाडीपाशी थांबावं का खालच्या दरी मधे उतरावं कारण तासा भरात पूर्ण अंधार झाला असता आणि आम्हाला खालती जाता आलं नसतं . असा विचार करत असतानाच एक मेसेज आला कि रिकव्हरी व्हॅन १५ मिनीटात पोहोचेल. आणि खरचं १० मिनीटात मेकेनीक हजर. या जंगलात हा इतक्या लवकर हा कुठून आला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यानी त्याची हत्यारं काढून ५ मिनीटात नवीन चाक बसवलं. त्याला शतशः धन्यवाद देवून आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला, आणि खालच्या सुंदर दरी आणि झऱ्याकडे निघालो. मजा म्हणून बर्फासारख्या थंड पाण्यातून नदी पार केली. पाण्यात मनसोक्त खेळून आणि फोटो काढून झाल्यावर परत आलो आणि फोर्ट विल्यम जवळच्या बेनविले गावातल्या अत्तापर्यंतच्या सर्वात सुंदर अश्या "चेज वाईल्ड गूज" या होस्टेल वर पोहोचलो.या ठिकाणी मात्र आम्हाला प्रशस्त आणि चौघांसाठी वेगळी रूम मिळाली. काही वेळात फ्रेश होऊन जवळचा सात मजली कॅनाल बघितला. हा कॅनाल या भागातील दोन वेगळ्या ऊंची वरची तळी जोडत होता. वास्तूकलेचा चमत्कारच! याच कॅनालवरच्या पूला वरून आम्ही होस्टेल पर्यंत गेलो होतो. हा पूल साधासुधा नव्हता ते दुसऱ्या दिवशी कळलं आम्हाला, जेव्हा एक उंच होडीला कॅनाल मधून वाट देण्यासाठी संपूर्ण पूल ९० अंशात फिरवला गेला!
जवळच्या एका भारतीय होटेल मधून जेवण पॅक करून आणलं. दुसऱ्या दिवशी खूप ड्रायविंग करायचे होते म्हणून लवकरच झोपलो.
प्रवासाच्या शेवटच्या दिवशीचं सर्वात पहिलं काम होतं ते पंक्चर काढण्याचं. आदल्या दिवशी फोन वर सांगितलेल्या ठिकाणी गाडी नेली. तिथे गेल्यावर कळलं की गाडीची टायर्स ट्यूबलेस होती आणि टायर २ठिकाणी फाटल्याने बदलायला लागणार होतं. खर्च होता २०० पाउंड(१४ हजार रूपये!) मोठ्ठा धक्का ! लगेचच आमच्या कार रेंटल वाल्यांना फ़ोन लावला आणि खात्री करून घेतली की या खर्चाचे पैसे परत मिळतील म्हणून. टायर बदलायचं पक्क झाल्यावर त्या गॅरेज मधे सुद्धा एक निराळा अनुभव मिळाला. अत्याधुनीक यंत्रांच्या सहाय्याने इतक्या सहज रीत्या मेकेनीक ने हे काम केले की ते फक्त पाहूनच आम्ही आश्चर्यचकीत झालो. झालेल्या खर्चाची रीसीट घेऊन इलीयन डोनन या सर्वात सुंदर सागरी किल्याच्या दिशेने निघालो.
या किल्यासाठी आम्हाला ६० मैल रॉयस्टनच्या विरूद्ध दिशेला जावं लागलं ,परंतु तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं कि या उलट्या दिशेचा प्रवास वाया गेला नव्हता. इतका सुंदर किल्ला होता तो ! या ठिकाणी मात्र आम्ही तिकीट काढून आत गेलो. जमिनी पासून किल्याला जोडणाऱ्या एका पूला वरून चालत गेलो आणि किल्यात प्रवेश केला.
या किल्यामधे सुद्धा जुन्या स्कॉटीश वस्तूंचं एक अत्यंत सुंदर प्रदर्शन होतं ज्यामधे एक अवजड तलवार उचलण्याचा योग आला. हुबेहून जुने किचन तर फारच सुंदर होते. या ठिकाणचे सर्व पदार्थ मेणाचे होते. खूप वेळ किल्या वर फिरलो. पार्श्वसंगीत होतं दारापाशी उभं राहून बॅग पायपर वाजवणाऱ्या वादकाचं.
या ठिकाणाहून आमचं घर जवळ जवळ १० तास लांब होतं. दुपारी ३ वाजता परतीचा प्रवास सुरु केला. दोन जणं आलटून पालटून गाडी चालवत होते. ग्लेनको या अत्यंत सुंदर दरी मधून हा रस्ता जात होता.
ग्लोस्गो शहराच्या जवळ पुन्हा १ तास आमची गाडी ट्रफिक मधे अडकली, पण नंतर मात्र पूर्ण रिकामा रस्ता मिळाला. गाडितले उरलेले तीघेजणं आलटून पालटून झोपत होते. मी मात्र पूर्ण प्रवास भर ड्रायवर च्या शेजारी त्याला झोप येवू नये म्हणून जागा होतो.
रात्री १ च्या सुमारास अजून एक अडचण आली. संपूर्ण रस्त्यावर दाट धुकं पसरलं, अगदी २ मिटर वरचं काही दिसेना. शिवाय आमच्या गाडीला धुक्यासाठीचे स्पेशल दिवे नव्हते. शेवटी नशिबाने एक ट्रक आमच्या पुढे ओव्हरटेक करून आला. त्याच्या बॅकलाईटच्या आधाराने धीम्या गतीने गाडी नेत होते.
रॉयस्टनला पोहोचे पर्यंत अडीच तीन वाजले होते. पेंगुळलेल्या मित्रांना निरोप देऊन घरी परतलो. सुखरूप घरी पोचलो या गोष्टीवर काही काळ माझाच विश्वास बसत नव्हता. :)
लेखाला "निराळ्या अनूभवांची" असं टायटल का दिलं हे कळलं असेल ना आता?


No comments:
Post a Comment