Saturday, 14 March 2009

रोयस्टन चा फेरफटका

रोयस्टन चा फेरफटका
घरात बसून नेट आराधना करण्याचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी एकटाच बाहेर पडतो. रस्ता फुटेल तिथे चालत राहतो. इकडची लोकं घराबाहेर चालत फिरताना दिसणं तसं दुर्मिळच. संध्याकाळी ४ वाजताच ‘गावा’तल्या मुख्य रस्त्यावर(हाय स्ट्रीट नाव आहे त्याचं) शुकशुकाट असतो. सगळी दुकानं तर ३,साडे तीनलाच बंद होतात. खरं तर हि दुकानं उघडी असो वा बंद काही जास्त फरक पडत नाही. बहुतेक वेळा या दुकानांमधे चिटपाखरू सुद्धा नसतं. का? कारण एकच, गावाबाहेर नवीनच उघडलेला टेस्को नावाचा शोपिंग मॉल. सर्व दैनंदिन गोष्टी एकाच ठिकाणी आणि स्वस्तात मिळत असतील तर कोण जाईल हो या दुकानांमधे? या मॉल संस्कृतीचे अनेक बळी इथे पाहायला मिळाले. शेकडो वर्षापासून चालणारी दुकानं अचानक बंद होऊ लागली. काहिंनी तर सरळसोट पणे पाटी टांगली होती "टेस्को मुळे आम्ही दुकान बंद करत आहोत". आपल्या सारख्या लोकांना वरदान ठरलेले मॉल अश्या प्रकारे किरकोळ विक्रेत्यांसाठी शाप सुद्धा ठरू शकतात हे कळून चुकलं.

ते जाउ दे. मी संध्याकाळच्या भटकंती बद्दल बोलत होतो. आशा वेळी तुम्ही एकटे भुता सारखे फिरत असता. रस्त्यावर कोणी असेल तर ,आपल्या कुत्र्याला घेऊन बाहेर पडलेला एखादा म्हातारा किंवा आपल्या पोराला बाबागाडी मधून फिरवायला बाहेर पडलेली एखादी ‘मम्मी’. सकाळच्या वेळेत तर फक्त १५ मिनीटांच्या वॉक मधे अशा ५,६ मम्मी आणि ३,४ कुत्रेवाले दिसतात. अनेक वेळेला एखादी छोटी सुद्धा आपल्या बाहुलीला बाबागाडीत ठेवून मम्मी आणि दुसऱ्या बाबागाडीतल्या धाकट्या भावाबरोबर फिरताना दिसते. अगदी ३ ४ महीन्यांच्या बाळाला सुद्धा मस्तपैकी गरम कपड्यांमधे गुंडाळून, बोचऱ्या थंडीमधे बाहेर पडतात या आया.


घराबाहेर पडणारी आणखी एक कॅटेगरी असते ती आजी आजोबांची. यांचे एक टोळकं रोज आमच्या बस मधून केंब्रिज ला जातं. ८०,९० वर्षांच्या या लोकांचा उत्साह पाहून थक्क होतो आपण. चालता न येणारे अनेक जण इलेक्ट्रिक व्हील चेअर वर फिरताना दिसतात. इकडचे पदपथ सुद्धा असे बनवले आहेत कि या गाडीवरून तुम्ही पूर्ण गावभर हिंडू शकता. रस्ता क्रॉसिंग च्या ठिकाणी यांना स्लोप दिले आहेत. अजून काय पाहिजे ?

कधी कधी एखादा टाईट कपडे घालून ‘रनिंग’ करताना दिसतो. तशी आम्ही सुद्धा अनेक वेळा ‘रनिंग’ करतो पर ती असते बस पकडण्यासाठी. घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या, मोनोटोनस आणि रुटीन फिरंगी आयुष्याचा कंटाळा येतो ४ ,५ महिन्यात. अशा वेळी भारतातलं रंगीबेरंगी, विविध सणांनी आणि सोहळ्यांनी नटलेलं आयुष्य हवंहवंस वाटतं.

2 comments:

  1. Kemu, you got urself 2 options:
    - Get urself a dog.
    - Get urself a girlfriend.

    That aught to help you tide over ur colourless boredom... :)

    ReplyDelete
  2. Everything.. mast comment.. mala vatate ki to bahutek girl friend prefer karel.. LOLz..
    Good post..

    ReplyDelete

इथून आले आहेत पाहुणे