Saturday, 7 March 2009

केशकर्तनालय

केशकर्तनालय

इंग्लंड मधे येऊन ४ महिने लोटले होते आणि माझे केस कानावरून गाला पर्यंत पोचले होते. लोकांना वाटलं , काहीतरी नवीन हेअर स्टाईल ट्राय करतोय मी. तशी हुषारी करून इथे यायच्या आधी केस जमेल तेवढे बारीक करुन आलो होतो.(हे असं सगळेच जणं करतात मी त्याला अपवाद नाही) पण आता काही दुसरा पर्याय नव्हता. डोकं इंग्रजी न्हाव्याच्या हवाली करायचं या विचारानीच माझं डोकं गरगरायला लागलं होतं.

तशी कारणं पण होती घाबरण्याची. गेले चार महिने या लोकांच्या हेअर स्टाईल बघून माझा पक्का समज झाला होता की इकडच्या न्हाव्यांना सरळ सध्या पद्धतीने केस कापता येत नाहीच मुळी. इकडुन कुरतडल्या सारखे काप, तिकडून कोणता तरी भडक रंग फास असा खेळ असतील बहुतेक. त्या मुळे काही दिवस भयानक स्वप्न पडत होती, ज्या मधे मी स्वतःला अश्या चित्रविचित्र केशरचने मधे बघत होतो.

दुसरं कारण होतं हजामतीच्या किमतीचं. ऐकून होतो की इकडचे न्हावी केसाबरोबर खिसा सुद्धा (फुकटात) कापतात. आपण कितीही सावध असलो तरी. पण काय करणार "अडला हरी इंग्रजी न्हाव्याचे ........... "

भारतातून निघताना मी तर असं सुद्धा ऐकलं होतं की परदेशात केशकर्तनालय फक्त बायका चालवतात. हे एक कुतूहल होतं ते नीराळंच.

शेवटी तो ऐतिहासीक शनिवार उजाडला.(हो,शनिवार. इथे रविवारी सगळी दुकानं बंद असतात आणि बाकिचे पाच दिवस आम्हाला वेळ नसतो. त्यामुळे नो ओप्शन ) मनाशी पक्का निश्चय केला होता, आज ही रिस्क घ्यायचीच. थोडी चौकशी करून स्वस्तातलं एक सलून हेरून ठेवलं होतं. "दि एज" हे त्याचं नाव. या "एज" वाल्या कडून दरी मधे ढकलले जाण्याची शक्यता कमी होती. कारण या न्हाव्यानी धड केस कापल्याची अनेक उदाहरणं माझ्या मित्रमंडळींमधे होती.

आत शिरल्या शिरल्या जॅकेट (आणि जीव) खूंटीला टांगलं. आणि त्याच्या खूर्चीत जाऊन बसलो. न्हावी कसला पैलवान (बोडी बिल्डर) होता तो. हात,पाय,गळा,खांदा, थोडक्यात काय संपूर्ण शरीर भर त्यानी टॅटू गोंदून घेतले होते. त्याचं ते रुप बघून अजूनच धडकी भरली. माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी मधे मी त्याला केस बारीक करण्याचा "हूकुम" दिला. लगेचच त्यानी लाइट वर चालणारं मशीन बाहेर काढलं आणि सफाईदार पणे काम चालू केलं. हि लोकं केस कापताना कात्रीचा वापर खूपच कमी करतात. अगदी वस्तऱ्या पासून ब्रश पर्यंत सर्व उपकरणांसाठी लाईट वर चालणारे पर्याय यांच्या कडे आहेत.

२० मिनीटात माझी त्या गुंडाळलेल्या प्लॅस्टिक च्या कापडातून सुटका झाली होती.
अत्यंत व्यवस्थित कापलेले केश आरश्यात बघताना मी सुटकेचा निश्वास सोडला. अपेक्षेप्रमाणे यानी माझ्या पाकिटातले ८ पाउंड कापले होते. अरे इतक्या पैश्यात माझी ७ वर्षांची कटींग झाली असती भारतात ! आणि म्हणे स्वस्तातलं सलून :) अजून एक नवीन अनुभव मिळाला होता मला.

1 comment:

  1. अरे या ब्लोग मध्ये तुझा केस कापलेला फोटो पण लावायचा........
    आम्हाला तरी कळेल ६४० रु. ला कसे केस कापून मिळतात.......

    ReplyDelete

इथून आले आहेत पाहुणे